Monday, June 10, 2019

एकट्याने राहणं.. सिंगल लिव्हिंग


एकट्याने राहणं..  सिंगल लिव्हिंग 

एकट्याने राहणं यावर खूप आधीपासूनच लिहावसं वाटत होतं. हे एकट्याचं राहणं आयुष्याच्या विविध टप्प्यात वारंवार समोर आलेलं होतं.. आहे.

त्याची सविस्तर ओळख होऊन, त्याचे असंख्य पैलू पाहून, त्याच्या काटेरीपणातून स्वत:ला थोडंफार बाहेर काढण्याचं कसब कमवेपर्यंत बरीच वर्ष जावी लागली.

 एकट्याने राहणं पूर्णत: सुखावह किंवा पूर्णत: दु:खदायक आहे असं वाटत नाही. ते तुम्ही कसं घेता यावरच बरंचसं निर्भर आहे. आणि हे आपण कसं घेतो, किंवा कसं घेऊ शकतो हे शिकण्याचा जो काही प्रवास झाला तो थोडाफार शेअर करावासा वाटतोय..

याच प्रवासातला एक मोठा व महत्त्वाचा टप्पा होता, डिअर वन्स या सपोर्ट ग्रूपची सुरुवात.

 ग्रूपबद्दल थोडक्यात ... 

एकट्या राहणाऱ्या स्त्रियांचा हा सपोर्ट ग्रूप नागपुरात आहे. तीन वर्ष झाली सुरू होऊन. ज्यांना जोडीदार नाही, किंवा जोडीदार सोबत नाही अशा स्त्रिया यात आहेत. काहींच्यासोबत मुले किंवा आईवडील आहेत. काहीजणी पूर्णपणेच एकट्या आहेत. वयोगट साधारण ३४ ते ८० असा आहे. ग्रूप अद्याप रजिस्टर्ड केलेला नाही. कुठल्याही अडचणीच्या वेळी आपल्याला अर्ध्या रात्री मदत मिळेल याची खात्री मिळावी असा प्रयत्न असतो. हे झालं, आकस्मिक वा प्रासंगिक बाबींचं. पण दैनंदिन जगण्यातही बरंच काही असतं जे सलत असतं.. मग त्याची चर्चा करतो.. मोकळेपणाने बोलतो.. बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. सगळेच विषय बोलले जातात.

या ग्रूपमुळेही एकट्याचं राहणंविषयी लिहावं असं वाटण्याची तीव्रता वाढली गेली.

एकच विनंती, हे लिखाण वाचताना किंवा त्याविषयी मत मांडताना एकच विनंती, जगण्यातलं संवेदनशीलपण जपावं आणि सभ्यता राखावी.

धन्यवाद.

वर्षा.

------------

 एकट्याने राहणं.. (१)

एकट्यानं राहणं ही बाहेरून कुणी पाहिली तर फारच भाग्याची, मौजेची गोष्ट वाटेल.. मला कित्येकदा संसारी मैत्रिणी म्हणतात, तुझं बरं आहे.. घरी जाऊन स्वयंपाक करायला नको, बाहेरच खाऊन जाऊ शकतेस.. किंवा एखाद्या गोष्टीसाठी कितीही वेळ तुला मिळू शकतो.. हवं तेव्हा सिनेमाला जाऊ शकतेस, पाहिजे तेव्हा खरेदी करू शकतेस...  हे सर्व खरं आहे..

पण ते अर्धसत्य आहे.

एकटं राहण्याचे अनेक खडतर आयाम आहेत.. त्यातील हा पहिला..

दोन वर्षांपूर्वी मला मे महिन्यात नागीण झाली होती. ज्यांना नागीण झाली असेल त्यांना माहीत आहे की त्याचा काय त्रास असतो तो.. असंख्य टाचण्या टोचल्याचा त्रास होतो. घाम आला की सहस्र टाचण्या आणि फॅन किंवा कुलरसमोर बसलं तरी सहस्र टाचण्या.. तब्बल वीस दिवस घरी बसून होते. सुरुवातीचे दोन-चार दिवस आळीपाळीने मैत्रिणी आल्या. थांबल्या. पण रात्री... एकटंच. घरभर फिरत रहायचे.. झोपणं शक्य नव्हतं. डोक्यात नागिणीचे फोड उठल्याने डोकं टेकवता येत नव्हतं..हतबलतेचा पराकोट.

 एका क्षणी सोडून दिलं स्वत:ला त्या वेदनांच्या हवाली.. शांतपणे त्या टोचण्यांना अनुभवत राहिले.. कुठली तरी क्षमता वाढत असल्याचा अनुभव होता. कशापासून तरी विरक्त होत असल्याची जाणीव होती.. उंच कड्यावर एकटं आहोत आणि मागे काहीही नाही.. पुढेही काहीही नाही.. जे आहे ते फक्त टोचणी आणि टोचणीच.. काही क्षण तसेच घालवले.. अवघं अस्तित्व काटेरी होतं..

 तशातच मनात एक विचार वेगळा आला. थेट आतून आला.. बस.. अजून थोडा काळ.. धीर धर.. मग पुढे त्रास होणार नाही.. त्या विचाराचा आवाज ऐकला आणि शांत वाटलं.. पुन्हा उठून घरात फिरू लागले..


आजही तो क्षण आठवतो..  एकटं राहण्यानं दिलेला तो एक आशीर्वाद वाटतो..

1 comment: